नांदुरा, दि. ८ जून २०२६ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानके व आगारांसमोरून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. माननीय उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने याचिका क्र. १८४/२०१४ व याचिका क्र. ४९/२०१५ मध्ये दिलेल्या आदेशानुसार नांदुरा बसस्थानकासमोर सोमवारी (दि. ८ जून) धडक कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान बसस्थानकासमोर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच बसस्थानकाच्या आवारापासून २०० मीटरच्या परिसरात खासगी प्रवासी वाहतूक वाहनांना प्रवेश व थांबा करण्यास प्रतिबंध करण्यात आला.
नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संतोष मुंजाळ, वाहतूक पोलीस ज्ञानेश्वर वाघमारे, सुखदेव काकड, श्रीकृष्ण संधुके तसेच नांदुरा बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रदीप गायकी उपस्थित होते.
या मोहिमेमुळे अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण येण्यास मदत होणार असून, परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्यास हातभार लागेल, अशी प्रतिक्रिया वाहतूक नियंत्रक प्रदीप गायकी यांनी व्यक्त केली.तसेच प्रवाशांनी खासगी अवैध प्रवासी वाहतुकीचा वापर टाळून सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी एसटी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
