पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास महापौर रवि लांडगे यांनी आज भेट देऊन रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, उपलब्ध पायाभूत सुविधा तसेच रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णालयाच्या कामकाजातील त्रुटी दूर करून नागरिकांना दर्जेदार, सुलभ व तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
रुग्णालयातील जीर्ण झालेल्या ऑक्सिजन वाहिन्या बदलण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. वैद्यकीय सेवा व पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक प्रस्ताव तयार करून सादर करावेत. तसेच रुग्णालयातील रक्ताची उपलब्धता सुरळीत राहण्याच्या दृष्टीने महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना महापौरांनी दिल्या.
मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर रुग्णालयाचे अद्ययावत व नागरिकाभिमुख संकेतस्थळ विकसित करणे, ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, औषधांची उपलब्धता, गुणवत्ता व नियमित पुरवठा सुनिश्चित करणे, उद्भवणाऱ्या लिफ्टविषयक अडचणींचे निराकरण करणे तसेच वाहनतळ व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्याबाबतही प्रशासनाला निर्देश देण्यात आले.
रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या सोयीसाठी स्वतंत्र मदत कक्ष कार्यान्वित करणे, रुग्णालयाच्या परिसरात आवश्यक दिशादर्शक व माहिती फलक उभारणे तसेच आकस्मिक वैद्यकीय अधिकारी (CMO) यांच्या कामकाजाशी संबंधित अडचणींचे निराकरण करण्याबाबत महापौरांनी सूचना दिल्या.मृत व्यक्तींच्या नातेवाइकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शवगृह विभागामार्फत मृतदेहासाठी आवश्यक कापड व इतर अनुषंगिक साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबतही महापौरांनी प्रशासनाला निर्देश दिले.
महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वेळेत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटी तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून प्राधान्याने व कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असे निर्देश महापौर रवि लांडगे यांनी दिले.
याप्रसंगी नगरसेवक योगेश बहल, जितेंद्र ननावरे, वर्षा जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
