वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी सुविधांचा घेतला आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी पुढाकार घेतला आहे. पार्किंग पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासह शहरातील विविध नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासह नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, क्रीडा सभापती प्रमोद कुटे, नगरसेवक उत्तम केंदळे, राजू मिसाळ, बापू घोलप, अमित गावडे, सुजाता कारंडे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दळणवळण, बीआरटीएस, वाहतूक तसेच अन्य संबंधित विभागांच्या कामकाजाचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
शहरात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पार्किंगच्या समस्येमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी पार्किंग पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी करणे, वाहनतळांचे योग्य नियोजन करणे आणि रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करणे याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यासोबतच पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींचाही आढावा घेण्यात आला. विविध विभागांतील प्रलंबित कामे, त्यातील अडचणी आणि आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. विकासकामांमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
“शहराचा सुनियोजित विकास आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पार्किंग पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होईल. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी समस्यांबाबत संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी. प्रलंबित कामे कोणतीही कुचराई न करता निर्धारित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. सर्व प्रभागांतील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
…….स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे
या बैठकीमुळे शहरातील पार्किंग व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि नागरी सुविधांच्या प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
