मुंबई प्रतिनिधी…..नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यात शस्त्रांच्या प्रकारानुसार आणि संख्येनुसार रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
भारत सरकारने देशातील डावी कडवी विचारसरणी तथा नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा निर्धार केला आहे. डाव्या उग्रवादी नक्षलवादी आणि माओवादी संघटनांचा प्रभाव असलेला रेड कॉरिडॉरचा मनसुबा केंद्र आणि राज्य सरकार यांच्या समन्वयामुळे उधळून लावला गेला आहे. त्यामुळे या रेड कॉरिडॉरच्या पश्चिम सीमेवरील गडचिरोली आणि गोंदिया हे जिल्हे नक्षलमुक्त झाले आहेत. या भागात आता मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्प राबविले जात आहेत.
दरम्यानच्या काळात माओवादी चळवळींच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत माओवाद्यांनी पोलीस स्थानकांवर आणि पोलीस पथकांवर हल्ला करून राज्याच्या सुरक्षा दलाकडील शस्त्रे लूटून नेली आहेत. नक्षलवाद्यांना अटक, त्यांचा बिमोड करण्यासाठी माहिती देणाऱ्यास तसेच सुधारित आत्मसमर्पण योजनेत शस्त्रांसह आत्मसमर्पण केल्यास नियमित बक्षिसांव्यतिरिक्त शस्त्रांच्या प्रकारानुसार अतिरिक्त आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आहे. पण सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देऊन, अशी शस्त्रे हस्तगत करण्यासाठी मदत करणाऱ्यांना रोख बक्षीस देण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे ही बेपत्ता शस्त्रे शोधण्यासाठी रोख बक्षीस देण्याचा प्रस्ताव गृह विभागाने सादर केला. त्यानुसार नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांची तसेच त्यांच्याकडील शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
स्वयंचलित, अर्धस्वयंचलित, इतर प्रकारची शस्त्रे तसेच दारुगोळा अशा प्रकारांसाठी बक्षिसांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ती शस्त्र प्रकारानुसार सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत आहे. बक्षिसांची रक्कम मंजूर करण्यासाठी व त्याबाबतची रक्कमेची मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांना दहा लाख रुपयांपर्यंतचे अधिकार आहेत. तर त्यापुढे २५ लाखांपर्यंत गडचिरोली परिक्षेत्रांचे उप महानिरीक्षक, पंचवीसहून अधिक ते पन्नास लाखांपर्यंतच्या बक्षिसासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान यांना आणि ५० लाख रुपये ते एक कोटीपर्यंतच्या बक्षीस रकमेचे अधिकार अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) यांच्याकडे असतील.