अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी आचार्य अत्रे रंगमंदिरात रंगला कथाकथनाचा कार्यक्रम
पिंपरी, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’मध्ये पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात कथाकथनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. डॉ. रजनी शेठ, ज्योती पुजारी, डॉ. दिलीप गरुड आणि डेगवेकर यांनी विविध कथा व अनुभव प्रभावी शैलीत सादर करत रसिकांना कथाविश्वाचा आनंद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. र. माडगूळकर यांनी केले. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि मराठीप्रेमी रसिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कथाकथन ही केवळ गोष्ट सांगण्याची कला नसून त्यातून अनुभव, विचार आणि भावना प्रभावीपणे मांडल्या जातात. पूर्वी आजी-आजोबा, आई-वडील यांच्याकडून ऐकल्या जाणाऱ्या गोष्टींमधून मनोरंजनासोबतच संस्कार आणि जीवनमूल्येही पुढील पिढीपर्यंत पोहोचत असत. बदलत्या काळात कमी होत चाललेल्या या गोष्ट सांगण्याच्या परंपरेला पुन्हा उजाळा देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डॉ. दिलीप गरुड यांनी ‘झेल्या’ ही कथा मिश्कील आणि प्रभावी शैलीत सादर केली. आवाजातील चढ-उतार, देहबोली आणि प्रसंगानुरूप अभिनयातून त्यांनी कथेतील व्यक्तिरेखा आणि प्रसंग रसिकांसमोर जिवंत केले. त्यांच्या कथनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
डॉ. रजनी शेठ यांनी अनुभवाधारित कथा सादर करत कथानकातील भावभावना आणि व्यक्तिरेखांचे विविध पैलू सहजतेने उलगडले. त्यांच्या निवेदनातील सहजता आणि प्रभावी मांडणीमुळे रसिक कथेशी जोडले गेले. यावेळी साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचीही माहिती देण्यात आली.
ज्योती पुजारी यांनी ‘नागपुरीने केला पुणेरी भतार’ ही कथा विनोदी शैलीत सादर करत रसिकांचे मनोरंजन केले. संवादफेक, निवेदनातील लय आणि प्रसंगानुरूप अभिनयामुळे कार्यक्रमात रंगत आली. डेगवेकर यांनीही विविध अनुभव आणि प्रसंग कथनातून सादर करत कार्यक्रमात वैविध्य आणले.
‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या निमित्ताने आयोजित या कथाकथनातून मराठीतील गोष्ट सांगण्याच्या समृद्ध परंपरेला उजाळा मिळाला. विविध कथा आणि निवेदनशैलीच्या माध्यमातून रसिकांना मराठी भाषेतील सहजता, गोडवा आणि वैविध्य अनुभवता आले.
या वेळी प्रशासन अधिकारी दत्तात्रय सूर्यवंशी, ग्रंथालय समन्वयक प्रवीण चाबुकस्वार, संगीत शिक्षक संतोष साळवे, आचार्य अत्रे रंगमंदिर व्यवस्थापक प्रशांत यादव यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक राज आहेरराव, राजेंद्र घावटे, सुहास पोकळे, आसाराम कसबे, पौर्णिमा कोल्हे, किशोर केदारी आदी उपस्थित होते.
