संकल्प युवा फाउंडेशनचे गणेश जगताप यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील भटक्या तसेच पाळीव कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असल्याचा दावा करत, विनापरवाना कुत्री पाळणाऱ्या नागरिकांवर तसेच कुत्रा पाळण्याचा परवाना असूनही आवश्यक ती काळजी न घेणाऱ्या मालकांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी संकल्प युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश जगताप यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात महापालिकेचा रीतसर परवाना घेऊन कुत्री पाळणाऱ्या नागरिकांची संख्या अत्यल्प असल्याचे नमूद करत, मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून विनापरवाना कुत्री पाळली जात असल्याचा दावा जगताप यांनी निवेदनात केला आहे. अशा कुत्र्यांचे वेळेवर लसीकरण, आरोग्य तपासणी तसेच सुरक्षितरीत्या पालन होत नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
विनापरवाना बांधकाम किंवा विनापरवाना नळजोडणीप्रकरणी कारवाई केली जाते, त्याच धर्तीवर विनापरवाना कुत्री पाळण्याबाबतही नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच परवाना असतानाही कुत्र्याला सार्वजनिक ठिकाणी मोकळे सोडणे, लसीकरण न करणे किंवा आवश्यक ती सुरक्षितता न बाळगणे अशा निष्काळजीपणाच्या प्रकरणांतही संबंधित मालकांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
झोपडपट्ट्या, चाळी, घरकुल तसेच पुनर्वसन प्रकल्पांमध्ये अनेकदा मर्यादित जागेत कुत्री पाळली जातात. त्यांना योग्यरीत्या बांधून किंवा नियंत्रित न ठेवल्यामुळे ती रस्त्यावर मोकाट फिरतात आणि काही ठिकाणी कुत्र्यांचे समूह तयार होतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, सायकलस्वार आणि दुचाकीस्वार यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
शहरातील काही वॉशिंग सेंटर, दुकाने, टपऱ्या, गॅरेज आणि हॉटेल परिसरातही कुत्री मोकाट ठेवली जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या मागे कुत्री लागल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये नागरिक आणि लहान मुले जखमी झाल्याच्या घटना घडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कुत्र्यांवरील कारवाई केवळ तात्पुरती न राहता त्यांचे मालक, परवाना व्यवस्था, लसीकरण आणि जबाबदारी निश्चित करण्याची यंत्रणा प्रभावी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पशुवैद्यकीय विभागाने नियमित तपासणी व कारवाई करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार दंडात्मक तसेच आवश्यक त्या प्रकरणांत फौजदारी कारवाईसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्यास न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचा इशाराही गणेश जगताप यांनी निवेदनातून दिला आहे.
