निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्याची मागणी; सार्वजनिक निधीच्या सुरक्षेसाठी आयुक्तांकडे चौकशीचे निवेदन
पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात रस्ते व गटार सफाईच्या कामांसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर ‘रिंग’ अर्थात निविदादारांमध्ये संभाव्य संगनमताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सदर निविदा प्रक्रिया रद्द करून खुल्या, पारदर्शक आणि व्यापक स्पर्धात्मक पद्धतीने फेरनिविदा काढण्यात यावी, अशी आक्रमक मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण होताच वाघेरे यांनी आयुक्तांकडे निवेदन सादर करून या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र व वस्तुनिष्ठ छाननी करण्याची मागणी केली. संबंधित निविदांचा मोठा आर्थिक आवाका असून त्याचा थेट संबंध महापालिकेच्या सार्वजनिक निधीशी आणि शहराच्या स्वच्छता व्यवस्थेशी आहे. त्यामुळे केवळ तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली म्हणून निविदा प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष झाली असे गृहीत धरता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘रिंग’चा संशय; निविदांची सखोल छाननी करा
निविदादारांमध्ये परस्पर संगनमत होऊन कृत्रिम स्पर्धा निर्माण झाली आहे का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी निविदादारांचे समान पत्ते, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी, अधिकृत प्रतिनिधी, कागदपत्रांची समान रचना अथवा मजकूर, डिजिटल व तांत्रिक बाबी तसेच परस्पर व्यावसायिक संबंध यांची नियमानुसार पडताळणी करावी, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.
तसेच आर्थिक बोलींमध्ये असामान्य साम्य आहे का, बोली पूर्वनियोजित असल्याचे संकेत आहेत का किंवा एखाद्या मर्यादित गटामध्ये कृत्रिम स्पर्धा निर्माण करण्यात आली आहे का, याचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पुढील कार्यवाही थांबविण्याची मागणी
निविदा प्रक्रियेवरील संशयाची वस्तुनिष्ठ पडताळणी पूर्ण होईपर्यंत निविदा मंजुरी, स्वीकृती किंवा पुढील कार्यादेशाशी संबंधित कार्यवाही लागू नियमांच्या अधीन राहून स्थगित ठेवण्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने विचार करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
छाननीदरम्यान वास्तविक आणि व्यापक स्पर्धा झालेली नसल्याचे अथवा निविदादारांमध्ये संगनमत झाल्याचे प्रथमदर्शनी आढळल्यास, लागू शासन नियम व ई-निविदा प्रक्रियेतील तरतुदींनुसार सदर निविदा रद्द करून नव्याने फेरनिविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, असे वाघेरे यांनी स्पष्ट केले.
‘विशिष्ट कंत्राटदाराला फायदा होईल, अशा अटी नकोत’
फेरनिविदा काढताना निविदेतील अटी व शर्ती कोणत्याही विशिष्ट कंत्राटदाराला किंवा मर्यादित गटाला अनुकूल ठरणार नाहीत, याची प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी. निविदेला व्यापक प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त पात्र आणि स्वतंत्र निविदादारांचा सहभाग वाढवावा, जेणेकरून महापालिकेला अधिक स्पर्धात्मक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दर प्राप्त होतील, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.
‘उद्देश आरोपांचा नाही, पारदर्शकतेचा’
“कोणत्याही विशिष्ट निविदादाराविरुद्ध आरोप करणे हा आमचा उद्देश नाही. महापालिकेच्या सार्वजनिक निधीचे संरक्षण, वास्तविक स्पर्धा, पारदर्शकता आणि निविदा प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास अबाधित ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. निविदा प्रक्रियेबाबत गंभीर संशय निर्माण झाला असल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी होणे आवश्यक आहे,” अशी भूमिका संदीप वाघेरे यांनी मांडली.
महानगरपालिकेच्या मोठ्या आर्थिक दायित्वाशी संबंधित असलेल्या या निविदा प्रक्रियेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन उपलब्ध निविदा अभिलेख व आर्थिक बोलींची सखोल छाननी करावी. प्रक्रिया संशयास्पद आढळल्यास ती रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने फेरनिविदा काढावी, अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी केली आहे.
