‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातील चिमणी कोसळल्याची बाब दडवली जातेय का? प्रशासनाने स्पष्ट उत्तरे द्यावीत
पिंपरी-चिंचवड, दि. ३ सप्टेंबर २०२६ : शहरातील वाढत्या कचऱ्याच्या प्रश्नावरून नगरसेवक ज्ञानेश्वर (माऊली) जगताप यांनी महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या ५० दिवसांपासून कचऱ्याची परिस्थिती बिकट होत असून, नागरिकांना पाणी, भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि कचरा अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले.
एनजीटी तसेच एमपीसीबीच्या अहवालांमधील मुद्द्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, कचरा व्यवस्थापनाबाबत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जगताप यांनी केली.
दरम्यान, ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातील चिमणी कोसळल्याची बाब प्रशासनाकडून लपवली जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. हा प्रकल्प किती दिवस बंद राहणार, संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली, किती दंड ठोठावण्यात आला आणि प्रकल्प पूर्ववत कधी सुरू होणार, याचा स्पष्ट खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी त्यांनी केली.
प्रत्येक प्रभागात कचरा विलगीकरणाचे प्रभावी नियोजन करून कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची गरज असल्याचेही जगताप यांनी सांगितले. ‘तरतूद नाही’ किंवा प्रशासकीय कारणे सांगून नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये; प्रशासनाने आता टाळाटाळ न करता तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.