पिंपरी, प्रतिनिधी : मागील दोन दिवसांपासून शहरात झालेल्या मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत झाडपडीच्या घटना घडल्या. या घटनांची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे व तुटलेल्या फांद्या हटवून परिसर सुरक्षित केला.
सेक्टर २४, निगडी प्राधिकरण, फिनोलेक्स कंपनी परिसर, पिंपरी, ओम साई हौसिंग सोसायटी (आकुर्डी) तसेच काजळे पेट्रोल पंपाशेजारील पुणे-नाशिक महामार्ग परिसरात झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन विभागाच्या पथकांनी त्वरित प्रतिसाद देत झाडे हटवली, वाहतुकीतील अडथळे दूर केले आणि नागरिकांची गैरसोय टाळली.
पावसाळ्यात सततचा पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडणे किंवा मोठ्या फांद्या तुटण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अशा वेळी संयम बाळगून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन अग्निशमन विभागाने केले आहे.
अग्निशमन विभागाची सर्व पथके पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर २४ तास सज्ज असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच झाड कोसळलेल्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये, तुटलेल्या फांद्या किंवा विद्युत तारा यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि स्वतः झाडे किंवा फांद्या हटविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केले आहे.
