पिंपरी : शहरात पावसाळा सुरू असून मुसळधार पावसामुळे दुर्घटनांची शक्यता वाढली आहे. नुकत्याच मुंबईतील चेंबूर येथे शालेय बसवर झाड कोसळल्याने एका चिमुकल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी शालेय परिसरातील धोकादायक वृक्ष व इतर जीर्ण संसाधनांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक शाळांच्या परिसरात जुनी, मोडकळीस आलेली व धोकादायक स्थितीतील झाडे, विद्युत खांब, मोठे होर्डिंग्ज, केबल लाईन्स, उघडी किंवा खराब चेंबरची झाकणे, जीर्ण इमारती, वाडे आदींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने सर्वेक्षण करून धोकादायक बाबी दूर कराव्यात.
तसेच पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग, उद्यान विभाग, विद्युत विभाग तसेच इतर संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देऊन शाळा परिसरासह सार्वजनिक ठिकाणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
