पिंपरी, दि. १ जुलै : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने नागरिक, विविध खासगी कंपन्यांतील कर्मचारी तसेच व्यावसायिकांना संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सायबर गुन्हेगार नामांकित व्यावसायिक, कंपनीतील वरिष्ठ अधिकारी किंवा इतर व्यक्तींचे व्हॉट्सअॅप खाते हॅक करून त्यांच्या प्रोफाइल फोटोचा वापर करतात. त्यानंतर त्यांच्या संपर्क यादीतील कर्मचारी, नातेवाईक व मित्रपरिवाराला व्हॉट्सअॅपद्वारे ZIP किंवा APK फाईल पाठवली जाते. या फाईलला “बँक स्टेटमेंट”, “अकाउंट स्टेटमेंट” अशा विश्वासार्ह नावांनी पाठवून ती उघडण्यास सांगितले जाते.
ही फाईल मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवर उघडताच त्यामध्ये मालवेअर किंवा व्हायरस प्रवेश करतो. त्यामुळे संबंधित उपकरण संक्रमित होऊन त्यातील गोपनीय माहिती, बँकिंग तपशील व इतर संवेदनशील डेटा चोरीला जाऊ शकतो. याचा वापर करून सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करतात.
सायबर पोलिसांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना :
💮अनोळखी किंवा संशयास्पद व्हॉट्सअॅप क्रमांकावरून आलेली ZIP किंवा APK फाईल उघडू नये.
💮फाईल पाठविणाऱ्या व्यक्तीशी थेट संपर्क साधून तिची खातरजमा करावी.
💮सोशल मीडियावरून प्राप्त झालेल्या संशयास्पद फाईल्स डाउनलोड किंवा ओपन करू नयेत.
💮व्हॉट्सअॅपमध्ये लिंक असलेली अनोळखी उपकरणे (Linked Devices) त्वरित काढून टाकावीत.
💮व्हॉट्सअॅपचे Two-Step Verification सुरू करावे.
💮मोबाईल व संगणकात अद्ययावत अँटीव्हायरस वापरावा.
💮उपकरण संक्रमित झाल्याचा संशय असल्यास CERT-In Bot Removal Tool च्या मदतीने तपासणी करावी.
सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी नागरिकांना कोणतीही संशयास्पद फाईल उघडण्यापूर्वी पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.