अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यभरातील पत्रकारांचे मार्गदर्शक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांचा आज वाढदिवस विविध स्तरांतून शुभेच्छा देऊन साजरा करण्यात येत आहे.
मूळचे बीड जिल्ह्यातील बनसारोळा येथील रहिवासी असलेले बापूसाहेब गोरे हे सध्या पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे स्थायिक आहेत. व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध वृत्तपत्रांतून त्यांनी सातत्याने पत्रकारिता करत समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचा व्यापक जनसंपर्क असून, त्यांच्या प्रभावी संवाद कौशल्यामुळे समाजातील अनेक घटकांमध्ये त्यांनी विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्नांचा पाठपुरावा करून ते सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत.
पत्रकारांच्या विविध समस्या सोडविणे, त्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे आवाज उठविणे आणि पत्रकारांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. उत्कृष्ट संघटन कौशल्य, अथक परिश्रमाची तयारी आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती ही त्यांची विशेष ओळख आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि त्यांच्या सामाजिक व पत्रकारितेच्या कार्याला अधिकाधिक यश लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
