जालना | प्रतिनिधी….बदनापूर येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई करत देशी दारूच्या बाटल्यांसह रोख रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, बदनापूर तहसील कार्यालयासमोर असलेल्या ‘मयूर पान सेंटर’च्या शेजारील मोकळ्या जागेत अवैध दारूची विक्री सुरू आहे. त्यानुसार बदनापूर पोलीस ठाणे पथकाने २१ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ७.४५ वाजता छापा टाकला.
या कारवाईदरम्यान कैलास आसाराम हडके (वय ३८, रा. बदनापूर) याला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून ‘भिंगरी संत्रा’ कंपनीच्या १८० एम.एल.च्या २९ सीलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूची किंमत २ हजार ३२० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपीकडून दारू विक्रीतून मिळालेली १ हजार ६७० रुपयांची रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली. एकूण ३ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक २७४/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (अ) व (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश दासर करत आहेत.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश गडाख, पो.हे.कॉ कोकणे व त्यांच्या पथकाने पार पाडली.
