पिंपरी, दि. १ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘घर घर संविधान’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी पीसीएमसी पब्लिक स्कूल, वाल्हेकरवाडी येथे शिक्षण समितीच्या सभापती रविना सागर अंगोळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे ४ लाख विद्यार्थी आणि ८ लाख पालकांपर्यंत भारतीय संविधानाची माहिती पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यावेळी बोलताना शिक्षण समितीच्या सभापती रविना अंगोळकर म्हणाल्या, “घर घर संविधान या उपक्रमामुळे संविधानाची मूल्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचतील. या माध्यमातून संविधाननिष्ठ, जागरूक आणि जबाबदार समाज घडविण्यास निश्चितच मदत होईल.”
कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक शेखर चिंचवडे, नगरसेविका पल्लवी वाल्हेकर, योगिता बारणे, उपायुक्त अण्णा बोदडे, शिक्षणाधिकारी संगीता बांगर, संविधान अभ्यासक तथा ‘माणगाव पॅटर्न’चे प्रमुख नूर खा पठाण, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले की, संविधानातील लोकशाही, समता आणि बंधुता ही मूल्ये बालवयापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर रुजणे अत्यंत आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे भावी पिढी संविधानाचा आदर करणारी, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक म्हणून घडेल. या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
संविधान अभ्यासक नूर खा पठाण यांनी भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रगतीचा मूलभूत दस्तऐवज असल्याचे सांगितले. उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दररोज संविधानातील एका कलमाची माहिती आणि त्याचे सविस्तर विवेचन करण्यात येणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिकार आणि कर्तव्यांविषयीची जाणीव अधिक दृढ होईल तसेच सुजाण नागरिक घडण्यास हातभार लागेल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी मानले. कार्यक्रमास सेवानिवृत्त शहर अभियंता एम. टी. कांबळे, रवींद्र दुधेकर, शरद जाधव, वसंत साळवी, अनिल सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
