मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीत सर्व मागण्या मांडणार; न्याय्य तोडग्याचे महापौर रवि लांडगे यांचे आश्वासन
पिंपरी, दि.३ जुलै :- पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या अनुषंगाने आज महापौर श्री. रवि लांडगे यांनी पवना धरणग्रस्त संघटना, जमीन हक्क परिषद आणि पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी महापौर कार्यालयात सविस्तर चर्चा केली.
यावेळी धरणग्रस्त प्रतिनिधींनी प्रकल्पासंदर्भातील विविध हरकती, सूचना, शंका व मागण्या महापौरांसमोर मांडल्या. प्रत्येक मुद्दा संयमाने ऐकून घेत त्याची गांभीर्याने नोंद करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहराच्या दीर्घकालीन पाणीसुरक्षेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असला, तरी धरणग्रस्त व स्थानिक नागरिकांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षणही तितकेच आवश्यक असल्याची भूमिका महापौरांनी स्पष्ट केली.
यानंतर महापौर श्री. रवि लांडगे यांनी धरणग्रस्तांच्या निवडक प्रतिनिधींसह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. या बैठकीत प्रकल्पाशी संबंधित विविध मागण्या, पुनर्वसन, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तसेच स्थानिकांच्या भावना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी महापौरांनी प्रतिनिधींना आश्वस्त करत सांगितले की, उद्या मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत धरणग्रस्तांच्या सर्व मागण्या, सूचना आणि भूमिका ठामपणे मांडण्यात येतील. विकास आणि लोकहित यामध्ये समतोल राखत, सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन न्याय्य, सकारात्मक आणि सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौरांनी यावेळी संवादातूनच प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि धरणग्रस्त यांच्या समन्वयातूनच हा महत्त्वाचा प्रकल्प पुढे नेला जाईल, असे नमूद केले.
या चर्चेस पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीचे सदस्य श्री. विश्वनाथ शेलार (अध्यक्ष, मावळ तालुका भारतीय किसान संघ), श्री. यशवंत बोडके (गहुंजे ग्रामस्थ व किसान संघ सदस्य), श्री. माऊली दळवी (माजी सभापती, पंचायत समिती मावळ), श्री. सुभाष धामणकर (तालुका अध्यक्ष, भारतीय किसान मोर्चा, मावळ), श्री. माऊली सोनवणे (अध्यक्ष, जमीन हक्क परिषद), श्री. राजू आगळे (माजी पंचायत समिती सदस्य, मावळ), श्री. नारायण बोडके (अध्यक्ष, पवना धरणग्रस्त संयुक्त समिती), श्री. अनंता महिपती खैरे (तिकोना धरणग्रस्त शेतकरी), श्री. बाळासाहेब काळे (सचिव, धरणग्रस्त संघटना, मावळ), श्री. अनंता वरवे (माजी सरपंच व गणाध्यक्ष, भाजप), ह.भ.प. शंकर महाराज आडकर (शिवली, मावळ) तसेच ह.भ.प. अनंता लायगुडे (आजीवली, मावळ) उपस्थित होते.
