राष्ट्रवादीकडून भाजपच्या ‘उधळपट्टी’वर हल्लाबोल
पिंपरी, दि.१५ मे : पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाचा दाखला देत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेत थेट बैलगाडीतून प्रवेश करत सत्ताधारी भाजपविरोधात अनोखे आंदोलन केले. पदाधिकाऱ्यांच्या सुविधा, परदेश दौरे आणि सुरक्षेवर होत असलेल्या कथित कोट्यवधींच्या खर्चाविरोधात राष्ट्रवादीने हे आंदोलन छेडत भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी प्रभाग क्रमांक ३० मधील नगरसेविका स्वाती माई काटे, प्रतीक्षा जवळकर आणि नगरसेवक राजू बनसोडे हे बैलगाडीतून महापालिका भवनात दाखल झाले. पारंपरिक वेशभूषा, घोषणाबाजी आणि बैलगाडीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे महापालिका परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली. नागरिक आणि कर्मचाऱ्यांनीही हा प्रकार पाहण्यासाठी गर्दी केली होती.
यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर निशाणा साधत, “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकप्रतिनिधींना काटकसर करण्याचे आवाहन करतात. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेत याच्या नेमके उलट चित्र दिसते. आर्थिक परिस्थिती डळमळीत असल्याचे सांगितले जाते, पण दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये, परदेश दौरे आणि अनावश्यक खर्च सुरूच आहेत,” असा आरोप केला.
महापालिकेतील अलीकडील निर्णयांचा उल्लेख करत राष्ट्रवादीने भाजपच्या कारभारावर ‘दिखाऊ विकास’ आणि ‘प्रसिद्धीचा हव्यास’ अशी टीका केली. सामान्य नागरिकांना पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक आणि आरोग्य सुविधांसारख्या मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत असताना सत्ताधारी मात्र जनतेच्या पैशांवर ऐशोआराम करत असल्याचा आरोपही करण्यात आला.
दरम्यान, बैलगाडीच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती, साधेपणा आणि इंधन बचतीचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. “हे आंदोलन प्रसिद्धीसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेविरोधातील निषेध आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनामुळे महापालिकेतील खर्च, पदाधिकाऱ्यांच्या सुविधा आणि आर्थिक प्राधान्यक्रम यावर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
